पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलकावरील नाव बघून आंदोलकांना संताप अनावर झाल्याचे बघायला मिळाले असून संबंधित फलकाचे नुकसान करण्यात आले.
गुरुवारी मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.याच बंदचा भाग म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी 11 ते दुपारी 2 या काळात ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या शेवटी प्रतिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.मात्र निवेदन दिल्यावरही काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून घोषणा देण्याचा प्रयत्न केला.या आंदोलकांना निवासी जिल्हाधिकारी माईकवरून शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
अखेर प्रवेशद्वार तोडून काही आंदोलकांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी इमारतीच्या उदघाटनाचा पत्र्याचा फलक दिसला. या फलकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव बघून आंदोलकांचा पारा चढला. संतापाच्या भरात फलकाला लाथा घालून वाकडातिकडा दाबून टाकला.