मनोज जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; प्रकाश आंबेडकरांनाही दिलं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:32 PM2024-01-08T13:32:53+5:302024-01-08T13:33:43+5:30
तुम्ही मौन धरलं होते. त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी आहेत असं वाटलं होते.परंतु तुमचे विचार समोर आलेत असं जरांगेंनी अजितदादांना म्हटलं.
जालना - तुम्ही उगाच बोललात. गप्प होतात ते जमत होतं. हा गप्प आहे म्हणून तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहात असं लोकांना वाटत होते. तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे हे लोकांना माहिती आहे. तुमच्या पोटातलं ओठावर आले. मराठ्यांचे वाटोळे करण्याची जी तुमची पूर्वीपासून सवय आहे ती पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केले अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडले. हे कालपासून तुमच्या बोलण्यातून सिद्ध व्हायला लागले. भुजबळच्या खांद्यावर हात टाकून हिंडा. मराठे तुमचा वेळेवर हिशोब करतील असं त्यांनी सांगितले. सामान्य मराठ्यांनी पैसे गोळा करून कार्यक्रम करतायेत. गावागावातून २-२ रुपये जमा करून सामुदायिक खर्च करून मुंबईत जाणार आहे. मुंबईच्या नावाखाली काहीजण पैसे गोळा करतायेत. त्यांनी पैसे गोळा करू नये. जर कुणी पैसे दिले असतील तर माघारी घ्यावेत. कुणीही असेल त्यांच्याकडून पैसे परत घ्यावेत. गोरगरिब मराठ्यांचे आंदोलन आहे. पैसे जमा करण्यासाठी आंदोलन नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत अजित पवार पहिल्यापासून मराठ्यांच्या मूळावर उठले आहेत. आम्हाला हे बोलायचे नव्हते. तुम्ही मौन धरलं होते. त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी आहेत असं वाटलं होते.परंतु तुमचे विचार समोर आलेत. पहिल्यापासून तुम्ही दहा पाच लोकं सोबत ठेवली आणि कोट्यवधी मराठ्यांचे वाटोळे केले. तुमचा पण पूर्ण होतोय का बघू. मराठ्यांवर तुम्ही कारवाई करून दाखवा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर
आमच्या नोंदी ओबीसीत सापडल्यात त्यामुळे आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार. त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडल्या असताना वेगळं आरक्षण घेणे म्हणजे स्वत:च्या लोकांना फसवल्यासारख्या आहेत. ५०-६० लाख नोंदी सापडल्यात. हक्काचे आरक्षण सोडून दुसरं ताट देणे ही समाजाची फसवणूक ठरेल. हे मराठा समाजाकडून शक्य नाही. आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. त्यांनी मराठा समाजासोबत राहावे. ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे अशा शब्दात मनोज जरांगेंनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले होते अजित पवार?
मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कुणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवावे असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता दिला. महाराष्ट्रात सर्व जातीधर्माची परंपरा आहे. सर्वांनीच सर्व जातीधर्माच्या श्रद्धास्थानांचा आदर केला पाहिजे. शाहू, फुले ,आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हाच विचार असून, तोच पुढे नेण्याचे काम आपण केले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. वाचाळवीरांची संख्या जास्त आहे. विकासावर ते काहीच बोलत नाहीत अशी टीका अजित पवारांनी केली.