Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जालना, बीड, धाराशीव, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले. मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळू नये, यासाठी आता मनोज जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या फोनवरून २४ मिनिटे चर्चा केली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांना एक आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे. याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांना आवाहन केले आहे.
माझे मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की...
राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरु आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत. माझे मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिल्याचे समजते. आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कोणती पावले उचलत आहे, त्याबाबतही माहिती दिल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगेंचे उपोषण मागे घेण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी काय पावले उचलता येतील यावर चर्चा झाल्याचे समजते.