Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून आतापर्यंत आलेले प्रस्ताव धुडकावून लावत मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक आपल्या वाहनांनी मुंबईकडे येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला असून सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. लोणावळ्याकडून मुंबईकडे येत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने प्रवास न करता जुन्या मुंबई-पुणे हायवेने यावं, असं आवाहन पोलिसांनी जरांगे पाटलांना केलं होतं. जरांगे यांनी पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जुन्या मुंबई-पुणे हायवेने येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही काही आंदोलक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेने येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेस वेवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे.
कसा असणार आंदोलकांचा प्रवास?
लोणावळ्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली असून आता त्यांच्या नेतृत्वात आंदोलक पनवेल, नवी मुंबईकडे रवाना होणार आहेत. आंदोलक नवी मुंबईत आल्यानंतर त्यांच्या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार लाखो मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलावची व्यवस्था केली आहे. घराघरांत भाकरी तयार करणार आहेत.
मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात २३ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तसेच २८ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २३ जानेवारी मध्यरात्रीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवस मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
"आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; आंदोलन मागे घ्यावे"
सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाज मागास कसा आहे, याबाबत मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.