अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 02:04 PM2023-10-28T14:04:36+5:302023-10-28T14:04:59+5:30

मराठा आंदोलकांनी अजित पवारांना केलेला विरोध पाहता परिस्थिती तणावग्रस्त झाली होती

Maratha Reservation: Ajit Pawar's decision not to go to Malegaon was correct, Sharad Pawar supported it | अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार

अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार

मुंबई – मराठा आरक्षणच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मराठा समाजाने राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यात बारामतीत अजित पवारांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. माळेगाव साखर कारखानाच्या गळीप हंगामाची सुरूवात आजपासून होतेय. याठिकाणी मोळीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु मोळीपूजनाला अजित पवारांनी येऊ नये असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला.

मराठा आंदोलकांनी अजित पवारांना केलेला विरोध पाहता परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक माळेगाव साखर कारखाना परिसरात जमले होते. परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोळीपूजनाला जाणे टाळले. शेतकऱ्यांच्या हातून मोळीपूजन करा अशा सूचना अजितदादांनी कारखाना प्रशासनाला दिल्या. अजित पवारांनी माळेगावला न जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी समर्थन केले.

शरद पवार म्हणाले की, लोकांच्या मराठा आरक्षणाबाबत काही भावना असतील तर अशावेळी तिथे संघर्ष टाळणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. माझ्या मते, अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं त्यांनी म्हटलं. तर आमचा विरोध अजित पवारांना नव्हे तर ६ राजकीय पक्ष आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांना आहे. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आरक्षणाप्रश्नी आम्ही त्यांना अडवले होते. ६ वर्षांनी अजित पवारांना अडवण्याची वेळ आमच्यावर राजकारण्यांनी आणली आहे. सध्या आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील आहे. ते जे भूमिका सांगतील ती आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं मराठा आंदोलकांनी म्हटलं.

दरम्यान, अजित पवार असो वा राजकीय नेते कुणालाही राजकीय कार्यक्रम घेऊन देणार नाही. मराठा समाजाच्या भावनाचा आदर राखावा. जर तरीही नेत्यांनी प्रवेश केला तर कारखान्यावर भगवं वादळ पाहायला मिळेल. या नेत्यांना पाऊल ठेऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून आम्ही आंदोलन करतोय. महिला, ज्येष्ठ, तरूण सगळेच आंदोलनात सहभागी झालेत. यावर जर दडपशाही करून आंदोलकांवर गाड्या घालायचे असतील तर ते अजित पवारांनी ठरवावे. आमचे आंदोलन पूर्ण शांततेने असेल असंही मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं.

नेत्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही

मराठा समाज म्हणून आमच्या वाट्याला निराशाच येते. १ लाख ६५ हजार मताधिक्यामध्ये मराठा समाजाचे योगदान नाही का? आम्ही अजित पवारांना मतदान केले. मग आमचे चुकतंय कुठे? सगळ्याच नेत्यांमागे समाज उभा राहतो. मतदानात आमचा वापर करतात. आम्हाला ओबीसीतून ५० टक्क्यातून आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. मराठा समाजाला भूलथापा देऊन वेळ काढू अशी भूमिका असेल तर समाज आता जागरुक झाला आहे. कोणत्याही नेत्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही असंही मराठा आंदोलकांनी स्पष्ट सांगितले आहे.

Web Title: Maratha Reservation: Ajit Pawar's decision not to go to Malegaon was correct, Sharad Pawar supported it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.