- शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणात सगेसोयरे ची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी यावेळेस सरकारच्या वतीने बार्शीचे अपक्ष आ. राजेंद्र राऊत यांची मध्यस्थी सुरू आहे.
दरम्यान, आमदार राऊत यांनी मंगळवारी रात्री उशिरा जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाविषयी चर्चा केली. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवर बोलणे करून देत जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याची माहिती फडणवीस यांना दिली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आमदार राऊत, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर एक सलाईन देखील लावून घेतले.
सोमवारी राऊत यांनी बार्शीत पत्रकार परिषद घेऊन यावेळी जरांगे पाटील यांना जास्त दिवस उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही असे सांगितले होते. व तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी देखील या प्रश्नो चर्चा केली होती. त्यानंतर आज पुनः त्यानी मध्यरात्री जरांगे पाटील यांची उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा केली आहे.
या तीन दिवसात जरांगे पाटील आणि सरकार यांच्याशी संपर्क ठेऊन आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना यश मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (बुधवारी) पुन्हा ते दोन मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटलांची घेणार भेट आहेत.