मुस्लीम आरक्षण मात्र डावलले: विरोधकांची टीकानागपूर: मराठा समाजाला शिक्षणात आणि राज्यातील नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने विधानसभेत गदारोळात मंजूर करून घेतले. तर मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करताना सरकारने मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणावर कोणतीच भूमिका न घेतल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मुस्लीम आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाची मुदत आज संपली. त्यामुळे युती सरकारने आज मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सभागृहात मांडले. पण त्यात मुस्लीम आरक्षणाचा उल्लेख नसल्याने विरोधकांनी घोषणाबाजी केली. गोंधळातच हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले आणि सभागृह तहकूब केले गेले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले़राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सरकारचा हेतू शुद्ध नाही. न्यायालयाने जे दिले ते तुम्ही त्या समाजाला देत नाहीत. समाजनिहाय वेगळे निकष लावणे योग्य नाही. विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावत, आज मंजूर झालेल्या विधेयकाचा मोठा फायदा न्यायालयात होईल, असे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले़मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिकाशिक्षणात जे आरक्षण मिळाले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास वेळ आहे. तोपर्यंत अॅडव्होकेट जनरल यांचे मत मागून घेतले जाईल व त्यावर निर्णय घेतला जाईल. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुभंगलेला आहे. त्यातून कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार भेदभाव मानत नाही. मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास आम्ही बांधील आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षण विधेयक मंजूर!
By admin | Published: December 24, 2014 1:04 AM