मुंबई - शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय गेम होत असून कपटी शक्तींच्या संमोहनातून जरांगेंनी बाहेर पडावे असा सल्ला भाजपा आमदार अमित साटम यांनी देत शरद पवारांवर निशाणा साधला.
भाजपा आमदार अमित साटम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत उपोषणाला बसले तेव्हा एक सामान्य मराठा म्हणून मला खूप अभिमान वाटला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करत होतात. शिवाजी महाराज ज्यावेळी युद्धावर जायचे तेव्हा कुठलीही सामान्य जनता त्यात भरडली जाता कामा नये असे त्यांचे आदेश असायचे. परंतु आता आपण शरद पवारांच्या नादी लागलात आणि भरकटत जात आहात असं त्यांनी म्हटलं.
तसेच आपल्या आंदोलनाला जो इतर समाजाचा पाठिंबा मिळत होता मात्र आता आपल्या बोलण्या आणि वागण्यानं त्यापासून दूरावत जात आहात असं वाटतं. अजूनही वेळ गेली नाही. कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावं अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आपल्यात गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे. सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली.
दरम्यान, शरद पवारांनी गरीब मराठा कुटुंबातून येणारा एकतरी मराठा मोठा केला असेल तर तो दाखवावा. मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे हे ते जाणतात म्हणून कदाचित तुमचा राजकीय गेम होत आहे असं सांगत अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला.
जरांगे पाटील-प्रसाद लाड यांच्यात जुंपली
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त करत आहेत. मात्र फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी पुढे आलेल्या प्रसाद लाड यांच्यावर जरांगेंनी तोफ डागली. "तू किती पैसेवाला आहेस आणि तू किती भ्रष्टाचारी आहेस. माझ्या नादी लागू नको. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तुझं घर मोठं करणारी औलाद आहे तू. माझ्या नादी लागू नको. मी तुझं केव्हा नाव घेतलं का? आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं झालंय," अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.