मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरून आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधिमंडळात घडलेल्या घडामोडींवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. ''सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात आहेत, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या'', असे मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले.
cआरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दांडी मारली होती. त्याबाबत प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते बैठकीला येणार नाहीत, हे आम्हाला माहिती होते. विरोधकही आमच्या विरोधात आहेत आणि सत्ताधारीही आमच्याविरोधात आहेत. यांना बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. मात्र मराठ्यांबाबतच्या बैठकीला जाण्यासाठी वेळ नाही आहे. मराठ्यांचं आरक्षण ओबीसींमधून द्या, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लावून धरण्याची गरज होती. मराठ्यांचा नुसता उपयोग करून घेऊ नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी नेहमी म्हणतात की, ऐंशीपासून ज्यांनी मराठ्यांना काही दिलं नाही, त्यांच्या मागे मराठे पळताहेत. मग तुम्ही त्यांनी केलेल्या चुकीमध्ये सुधारणा करा. मराठा समाज ओबीसींमध्येच आहे. तुम्हाला रस्त्यावर उतरलेले मराठे दिसताहेत का? तुम्ही माझ्याविरोधात केस टाकल्या, चौकशीसाठी एसआयटी नेमली, का तर मी मराठा समाजाची बाजू घेत आहे, म्हणून हे केलं जातंय ना. मी कट्टर मराठा आहे. माझ्या समाजासाठी मी काही करू नये का? आता मी करायला लागलोय, म्हणून छगन भुजबळांनी ओबीसींचे नेते उभे केले आहेत. माझ्याविरोधात सगळे एकत्र आलेल. मग मराठा नेत्यांना एकत्र व्हायला रोग झालाय का? असा संतप्त सवाल, मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.