Maratha Reservation: मराठा आरक्षणावर चर्चाच चर्चा; जाळपोळीवरून हायकोर्ट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:30 AM2018-08-03T05:30:14+5:302018-08-03T05:31:08+5:30

मराठा समाजास आरक्षण देणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष हे आरक्षण कसे द्यावे, याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. तो सापडेपर्यंत संयम आणि शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री बैठका घेत आहेत.

Maratha Reservation: Discussion talk on Maratha reservation; High Court screams from the fire | Maratha Reservation: मराठा आरक्षणावर चर्चाच चर्चा; जाळपोळीवरून हायकोर्ट संतापले

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर चर्चाच चर्चा; जाळपोळीवरून हायकोर्ट संतापले

Next

मुंबई : मराठा समाजास आरक्षण देणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष हे आरक्षण कसे द्यावे, याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. तो सापडेपर्यंत संयम आणि शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. परंतु आंदोलकांचा धीर संपला असून ७ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास ९ आॅगस्टच्या क्रांती दिनापासून राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे या आरक्षणासाठी आणखी दोन आत्महत्या झाल्याने हिंसाचार थांबला असला तरी धग कायम राहिली.
आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दोन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत त्यांनी मराठा समाजातील मान्यवरांना निमंत्रित करून सरकारची भूमिका स्पष्ट केली. बैठकीनंतर शांतता व सौहार्दाचे आवाहन संयुक्त निवेदनात करण्यात आले. दुसºया बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर भाजपा आमदारांची मते जाणून घेतली. विषय आणखी भडकेल असे उक्ती वा कृतीने काहीही करण्याचे टाळा, संयम पाळा आणि मराठा समाजाच्या कल्याणासाठी सर्वात जास्त योजना आपल्याच सरकारने आणल्याचे जनतेत जाऊन सांगा, असे त्यांनी मंत्री व आमदारांना सांगितले.
चर्चेसाठी बोलावूनही न जाणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या मंडळींनी विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी बैठका घेऊन सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला.
या आंदोलनात मराठवाड्यातील आत्महत्या आठवर पोहोचल्या. औरंगाबादमध्ये चौधरी कॉलनीत राहणाºया उमेश आसाराम एंडाईत (२२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २९ जुलै रोजी विषप्राशन केलेल्या तृष्णा तानाजी शिंदे या तरुणीचे गुरुवारी निधन झाले. मराठा आरक्षण मिळत नसल्याने शिकून काही उपयोग नाही, अशा निराशेच्या चिठ्ठ्या लिहून या दोघांनी आत्महत्या केल्या. संजय कदम या युवकाने अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कक्षासमोर अंगावर रॉकेल ओतून तर जालना जिल्ह्यात भायगव्हाण येथील नामदेव गरड (वय ३०) याने मराठा आरक्षणासाठी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

न्यायालयाचे सवाल?
राज्याची सद्य:स्थिती विदारक आहे. जमाव रस्त्यावर उतरून बसेसची जाळपोळ करतो, दगडफेक करतो आणि पोलिसांना मारण्यातही येत आहे. राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही?
लोक सार्वजनिकरीत्या त्यांची मते, विचार निर्भयपणे मांडू शकत नाहीत. मोकळेपणाने वावरण्यासाठी व मते मांडण्यासाठी लोकांना पोलीस संरक्षण द्यावे लागेल, असाही दिवस आता आपण पाहणार आहोत का?

आरक्षणासाठी आता
तरुणीची आत्महत्या
आरक्षणासाठी मराठा तरूण जीव देत असताना आता तरूणीनेही याच कारणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. तृष्णा तानाजी माने असे या तरूणीचे नाव आहे. ती १९ वर्षांची होती. तरूणीने आत्महत्या केल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

निश्चित वेळेत आरक्षण देणार - मुख्यमंत्री
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत. कालबद्ध आणि निश्चित वेळेत आम्ही आरक्षण देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देणे अमान्य केले तर सरकारकडे प्लॅन बी आहे का?
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

Web Title: Maratha Reservation: Discussion talk on Maratha reservation; High Court screams from the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.