जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याची घटना घडली. आता याबाबत जरांगे पाटलांनी नवा दावा केला आहे. लाठीचार्जवेळी काही पोलिसांनीच एकमेकांना मारलं. लोकांना मारायचे आणि आंदोलन मोडून काढायचा हा त्यांचा डाव होता. हे सगळं ठरवूनच ते आले होते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही आमच्या गावात बसलो होतो. आम्ही कट कसा रचणार? तुम्ही बाहेरून कट रचून आला आणि आमच्यावर लाठीचार्ज केला. माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. सगळ्यांना माहिती आहे मला १०-१२ दिवस काय होत नाही. कारण माझ्यात नुसती हाडकं आहेत.तिसऱ्या दिवशी असं काय झाले मला हॉस्पिटलला न्यायला आले. त्यांचे डॉक्टर सांगतायेत याला काय झाले नाही. पोलीस मला हॉस्पिटलला न्यायला आले. आधी २ दिवस ते आले होते. मला सलाईन लावायची तर इथे लावा असं मी सांगितले. त्यांचा डाव आधीपासून होता. प्लॅनिंगनुसार मला तिथून न्यायचे हे पोलिसांनी ठरवले होते. पोलिसांनी एकाएकी अचानक मारायला सुरुवात केली.तुम्ही महिलांना, लेकरांना मारले. डोकी फुटली, रक्त पडत होते. हे भयानक दृश्य होते. मला तुम्हाला न्यायचे होते मग तुम्ही मला घेऊन का गेले नाही? मी आजतागायत तिथे होतो.याचा अर्थ हे आंदोलन तुम्हाला मोडायचे होते असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत पोलीस सांगत होते, आम्हाला वरून आदेश आले तर वरचे म्हणतात खालच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिले.निष्पाप महिलांवर लाठीचार्ज झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होऊ द्या. कोण कोण अधिकारी होते. कुणी कट रचला मागच्या १५-२० दिवसांची कॉल रेकॉर्डिंग काढा.आमच्याही काढा. दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या. उपोषणस्थळी शांततेचे वातावरण होते. पोलीस इतके कलाकार होते की ते एकमेकांना कोपरे हाणत होते. जवळ आलेल्या माणसांच्या अंगावर जायचे जेणेकरून समोरच्या राग यावा. तसे प्रकार करत होते. लोक हात जोडत होती. तुम्ही माणसांमध्ये येऊ नका. तेवढ्यात पोलिसांनी ढकलाढकली सुरू केली. त्यात पोरं खाली पडली. त्यानंतर जे काही सुरु झाले. त्यांच्यातच काहींनी एकमेकांना मारले.चौकशी करा.ढकलाढकलीत माणसं खाली पडली. त्यानंतर इतका धूर झाला की कुणीच कुणाला दिसत नव्हते. एकाही पोलिसाने एका हाताने काठी हाणली नाही तर दोन्ही हातांनी लाठ्याकाठ्या मारल्या. धूर एवढा झाला त्या धूरात काही दिसले नाही असं जरांगे पाटील म्हणाले. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, आंदोलक हात जोडत होते. पोलीस ठरवून आले होते. ताकदीने ते अंगावर जात होते.आम्ही कधी समर्थन केले नाही. जे चूक आहे ते चूक, पण हे का घडवून आणले गेले. त्या लोकांना सोडू नका.किमान दुसऱ्या गावात आणि राज्यात असे होणार नाही की पोलिसांनी निष्पाप लोक, महिलांवर मारले आहे. लोकांना हाणून आंदोलन मोडायचे होते. लाठीचार्जनंतर काही वेळासाठी मी बाजूला गेलो होतो. धूरामुळे डोळेही उघडत नव्हते. मला चालताही येत नव्हते. धूर कमी झाल्यावर मी तिथे आलो. भुजबळांचा मराठा आरक्षणाला गेल्या १०-१५ वर्षापासून विरोध आहे. कडाडून विरोध केलाय. वैचारिक विरोध असायला हवे. तिथपर्यंत ठीक होतो.आम्ही गप्प बसलो होतो. अंबडला जायची गरज काय होती? तिथे बोलायची गरज काय होते? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर तो कुणी असो मी सोडत नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला.