बीड - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) चर्चेतून मार्ग निघतो,पण आम्ही थांबणार नाही. तुम्ही चर्चेत गुंतवून आम्हाला पुढे पुढे ढकलत राहणार हे चालणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवं आहे. सरकारसोबत आजही चर्चा सुरू आहे. वेळ देणार नाही. तुमचे शब्द होते, तुम्ही पूर्ण केला नाही. आम्ही कधीही चर्चेला आलेल्या परत पाठवले नाही.तुमचा सन्मानच केला. तुम्ही ३० दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले. चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि विषय भरकटवायचा हे होणार नाही अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेपूर्वी दिला आहे.
बीडमध्ये जरांगे पाटलांची निर्णयाक सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली होती.परंतु आजही यावर ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी जरांगेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला किती दिवस तुम्ही झुलवत ठेवणार? आमच्या संयमाचा अंत पाहिला जातोय. तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? सुरुवातीला ३ महिने, त्यानंतर ४० दिवस दिले तरी पुढे काय झाले? अजूनही आज आणि उद्याचा दिवस आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही कायद्याच्या चौकटीतच आरक्षण मागतोय, आम्ही मागास सिद्ध झालोय, ५४ लाख नोंदी सापडलेत. मग हे कायद्यात बसलेत ना..किती दिवस समाजाला येड्यात काढणार आहात? मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच. इच्छाशक्ती असली की एका दिवसात आरक्षण मिळेल. एकाचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करताय. पुढील काळात मराठे कसे आरक्षण घेतात हे तुम्ही पाहा. मराठ्यांनी ज्याला मोठे केले, त्याच्या डोक्यात किडे भरले आहेत. विष ओकायला लागलेत. ही किती गटारगंगा होती हे मराठ्यांना लक्षात आले. कुजकं बोलतो का? माझ्या नादी लागू नको. शहाणा हो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे.
दरम्यान, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, वारंवार चर्चा केली जातेय. तेच तेच सुरू आहे. सरकारने माझ्याशी संपर्क केला, बोलणं सुरू आहे. पण किती दिवस चर्चा करणार? संयमांचा अंत किती बघणार? प्रत्येकवेळी मराठ्यांनी शब्द पाळायचा. आम्हालाही काही मर्यादा आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलणे नाही, गिरीश महाजनांचा फोन आला होता. कायद्याच्या चौकट सरकारच्या दृष्टीने वेगळी आहे का? लोक हुशार झालेत. आम्हाला आरक्षण हवं आणि आम्ही ते घेणारच. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून सरकार चाललंय असा आरोप जरांगे पाटील यांनी सरकावर केला.