अंतरवाली सराटी – मागील वेळी १७ दिवस उपोषण केले, आज पुन्हा आठवा दिवस आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर सरकार का काढत नाही? आता माझ्या वडिलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर एक मुलगी म्हणून सांगते, राजकीय नेत्यांच्या घरात घुसून त्यांनी हाणेन अशा संतप्त भावना मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटलांची मुलगी म्हणाली की, मराठा समाजाने उग्र आंदोलन करू नये. दगडफेक, जाळपोळ झाल्यावर तुम्ही तात्काळ गुन्हे दाखल करणार असं बोलता, मग जेव्हा जालन्यात लाठीचार्ज झाला तेव्हा तुमची लवकरात लवकर कारवाई कुठे गेली होती? ते दिसत नाही. मराठ्यांकडून चूक झाली तर लगेच दिसते. मग सरकारला त्यांची चूक का दिसत नाही. आरक्षण देऊ म्हटलं आणि विश्वासघात केला. असा सवाल तिने केला आहे.
तर मराठा नेत्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत तोडगा निघायला हवा होता. तुम्ही अर्ध्यांना जेवायला बसवतो, बाकीच्यांना उठवता असं न करता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. माझा नवरा ८ दिवसांपासून विना अन्नपाण्याचा उपोषणाला बसला आहे. तुम्ही फक्त २ दिवस उपाशी राहून दाखवा. ८ दिवसांपासून ते काही खात नाहीत. हे सरकारला दिसत नाही का? असं मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीने म्हटलं आहे.
दरम्यान, सरकारने आरक्षण लवकर द्यावे, माणसं आत्महत्या करायला लागलेत. आमचे आरक्षण आम्हाला द्या, हे कधीपर्यंत सुरू राहणार आहे? आमची सरकारला हात जोडून विनंती आहे. मुलगा उपाशी असताना आमच्या तोंडात घास जात नाही. आम्हाला जेवणही जात नाही. आम्हाला आंदोलनठिकाणी जाऊच दिले नाहीत. तुम्ही येऊ नका असं मनोज जरांगे पाटलांनी कुटुंबाला सांगितले आहे असं जरांगे पाटलांच्या वडिलांनी सांगितले आहे.
जरांगेंनी उपोषण मागे घ्यावी, सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह ३२ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत कायदेशीर प्रक्रियेला काही अवधी लागणार असून टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यावर एकमत झाले. त्याचसोबत जरांगे पाटलांनी काही वेळ सरकारला द्यावा. उपोषण मागे घ्यावे असंही सर्वपक्षीय बैठकीतून नेत्यांनी आवाहन केले.