जालना - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) सरकारनं सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं काय केले? तुम्ही स्वत:ला मोठे समजत असाल पण जनता समजत नाही. मोटारसायकल दिली पण पेट्रोल दिलं नाही अशी अवस्था आहे. जर तुम्ही सगेसोयरेबाबतची अंमलबजावणी करून मराठा आरक्षण दिले असते तर १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला निसता. आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत जर एकदा आंदोलनाची तारीख ठरली की विषय संपलाच. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे आंदोलनास बसलेल्या जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, २०१८ मध्ये अशाप्रकारेच मराठा आरक्षण निवडणूक जवळ आल्यावर दिले होते. त्याचा फायदा त्यांना झाला होता. पण आता समाजाच्या लक्षात आलंय. त्यावेळी दिलेले आरक्षण रद्द झाले. आता तेच आरक्षण पुन्हा दिले, आता हा प्रयोग लोकांच्या लक्षात आला आहे. पहिल्यांदा समाज फसला, आरक्षण मिळाले म्हणून मते दिली होती. त्यामुळे समाजाला सगेसोयरेसह दोन्ही आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच मराठा आरक्षणासारखा ज्वलंत मुद्दा राज्यात असताना सरकार निवडणूकच घेणार नाही. सगेसोयरेबाबत अंमलबजावणी केल्यानंतर निवडणूक होऊ शकते. सगेसोयरेबाबत मराठा आमदारांनी विधिमंडळात भाष्य केले का? तुम्हाला बोलू दिले नाही असं म्हणत असाल तर निदान तुम्ही पत्र दिलंय का ते दाखवा. मराठ्यांना येड्यात काढू नका. ज्यावेळी बोलायला संधी मिळाली तेव्हा किती आमदार बोलले त्यांची नावे लक्षात आहेत. नागपूर अधिवेशनात कोण बोलले आणि कोण नाही हे समाजाला माहिती आहे. मराठा आमदारांनी डोक्यातील हवा कमी केली पाहिजे. जनतेने तुम्हाला मोठे केले. तुमचे कोणी काहीही करू शकत नाही अशी भाषा करता, तुम्ही कोण लागून गेले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
दरम्यान, सरकारकडे आणखी १-२ दिवस आहे. एकदा आंदोलनाची तारीख ठरली तर विषय संपला. आमच्यापुढे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा मग निवडणूक घ्या. एकदा आंदोलन सुरू झाले तर थांबत नाही. सहा महिन्यापासून सलग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला कितीही दिवस लागले तरी मागे हटणार नाही. मराठ्यांना विजयाचा टिळा लागल्याशिवाय मागे हटत नाहीत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.