मुंबई : 'मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाडतानाच हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे', असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजे. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा व बहुजनांचा पाठिंबा व सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे, असे शरद पवार यांनी एक पत्रक काढून मराठा आंदोलकांना हे आवाहन केले आहे.
राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे. त्या छत्रपतींनी अठरापगड जातींना, बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का लागेल असे आचरण आपल्या हातून घडणार नाही यांची खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे सुरुवातीला शांततामय मार्गाने आंदोलन झाल्याबद्दल निर्माण झालेली समाजातील सदिच्छा गमावणे हे चांगले लक्षण नाही, हे मी विशेषत्वाने नमूद करू इच्छितो, असेही शरद पवार यांनी आपल्या पत्रकाद्वारे केले आहे.
गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेच्या शेतकरी आत्महत्येच्या संदर्भातील अहवालाचा हवालाही दिला आहे. जमिनीचे लहान लहान तुकडे पडत गेल्याने मराठा समाजाची स्थिती हालाखीची बनली आहे. 28 टक्के मराठा भूमिहीन आहेत. तर त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण 46 टक्के आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षांच्या या वंचनेमुळे मराठा समाजात व विशेषत: युवकांच्या मनात राग साठणे नैसर्गिक असले तरी जाळपोळ दगडफेक करणे किंवा आत्महत्या करणे हा मार्ग नक्कीच नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.