कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे राज्यभर दौरा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केली.येथील टाऊन हॉल परिसरातील नर्सरी गार्डनमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळास खासदार संभाजीराजे यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते.
या दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोन आला होता. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी त्यांनी विनंती केली. पण मी राज्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले. राज्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर २७ आणि २८ मे रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल. मराठा समाजासोबत ठाम पणे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अभिवादन करताना गवळी समाजाचे माजी अध्यक्ष गोरखनाथ गवळी, परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वसंतराव वठारकर, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शहाजी कांबळे, सतीश कोरवी, धनंजय सावंत, दिंगबर फराकटे, नागेश घोरपडे यांच्यासह विविध समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.