मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन छेडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार आज जरांगे पाटील हे हजारो मराठा आंदोलकांसह आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे आंदोलक मजल दरमजल करत २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील हे २६ जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकांचा प्रवास पुढीलप्रमाणे असेल. आज अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा समाजातील आंदोलक हे आज रात्री मातोरी, ता. शिरूर येथे मुक्काम करणार आहेत. तर २१ तारखेला मराठा आंदोलक दुपारी पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथे भोजन करतील. तर रात्रीचा मुक्काम हा करंजी घाटातील बाराबाभली येथे असेल. २२ जानेवारीला हा मोर्चा भोजनासाठी दुपारी सुपा येथे थांबेल. तर मराठा आंदोलकांचा रात्रीचा मुक्काम रांजणगाव गणपती येथे असेल. २३ जानेवारी रोजी दुपारपर्यंत मराठा आंदोलक हे कोरेगाव भीमा येथे पोहोचतील. त्यानंतर या सर्वांचा रात्रीचा मुक्काम हा चंदननगर येथे असेल. २४ तारखेला हे आंदोलक पुण्यात पोहोचतील. तर रात्रीचा मुक्काम लोणावळा येथे करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी हे आंदोलक घाट उतरून पनवेल येथे दाखल होतील. तर रात्री वाशी येथे मुक्काम करतील. २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व मराठा आंदोलक मुंबईत चेंबूर येथून पदयात्रेद्वारे हे सर्वजण आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे दाखल होतील.
आंदोलनाला रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावूक होत आवाहन केलं आहे. ते म्हणाले की,’’माझं मराठ्यांना शेवटच सांगणं आहे मी तुमच्यात असेन नसेन मला माहित नाही, मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुलं संपली पाहिजेत, अस त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले.