Manoj Jarange Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आक्रमक भाषेत टीका केल्यानंतर सरकारकडून जरांगे यांच्या एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे हे राज्यातील विविध ठिकाणी जात गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांविरोधात हल्लाबोल केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आज 'मोफत नोकरी महोत्सवा'चे उद्घाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांचं सध्याचं वागणं म्हणजे 'बुडत्याचे पाय डोहाकडे' या म्हणीप्रमाणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हेच नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. माझ्यावर फुलं उधळणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं?" असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्याने काही होणार नाही. हे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही, असा टोलाही जरांगेंनी लगावला आहे.
९०० एकरवर सभा घेण्याची घोषणा
राज्य सरकारवर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, "राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, आम्ही ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकारचं हे आरक्षण फसवं असून आम्हाला मान्य नाही. ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, ते घेतील. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. त्यावर, आम्ही ठाम असून लवकरच ९०० एकरामध्ये मोठी सभा होईल. त्यासाठी, राज्यभरातील कोट्यवधी मराठा एकत्र येतील," अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.