जालना : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात सुरू झालेला वाद थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. हे दोन्ही नेते आता एकमेकांवर वैयक्तिक आगपाखड करू लागले असून आरोप-प्रत्यारोपांनी खालची पातळी गाठली आहे. सतत दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडन्या खराब झाल्या असल्याचा बोचरा वार कालच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांनी केला होता. या आरोपाला आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून भुजबळ यांना उघड आव्हानही दिलं आहे.
छगन भुजबळांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मी याआधीच भुजबळांना चॅलेंज दिलं होतं. आज पुन्हा हे चॅलेंज देतो. मी जन्मल्यापासून आजपर्यंत एकदाही दारू प्यायलेली नाही. माझी नार्को टेस्ट करा. शरीरात दारूचा एक थेंबही आढळला तर मी जिवंत समाधी घ्यायला तयार आहे. पण दारू न आढळल्यास भुजबळांनी समाधी घ्यावी," असं आव्हान जरांगे पाटलांनी दिलं आहे.
पुन्हा घणाघाती हल्ला
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर आक्रमक शब्दांत टीका केली आहे. "गिरीश महाजन यांनी सांगितल्यामुळे मागील दोन दिवसांपासून आम्ही भुजबळ यांच्याबद्दल एकही शब्द काढत नव्हतो. पण त्यांनी काल पुन्हा माझ्यावर टीका केली. ते बोलल्यावर मी शांत कसा बसणार? ते आता बधीर झाले असून त्यांना गोळ्या सुरू करण्याची गरज आहे," असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे.
दरम्यान, भिवंडी येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीचा समाचार घेत जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.