लातूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून मराठा आरक्षण प्रश्नावरून वातावरण ढवळून काढलं आहे. सध्या लातूर दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारी लोकंच सध्या मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाज सध्या शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका. अन्यथा तुमचा सामना आमच्याशी आहे," असं आव्हान जरांगे पाटलांनी दिलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता. पण आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणाविरोधात जे लोक बोलत आहेत त्यामध्ये भाजपमधीलच काही मराठा नेतेही आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीसांनी या नेत्यांना समज द्यावी, नाहीतर उघडपणे भूमिका जाहीर करावी. मगा आम्हीही बघून घेऊ. या नेत्यांना आवरलं नाही तर आम्ही तुमचं सगळंच बाहेर काढू ," असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत जी भूमिका घेतलीय, त्यात बदल करावा अन्यथा अधिवेशनानंतर मराठे काय आहेत ते त्यांना दाखवून देऊ, असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळांचाही समाचार
इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "छगन भुजबळ यांना सध्या जातीयवादाची स्वप्न पडत आहेत. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण होणार नाही. आम्ही गावखेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मराठा समाजासोबत ओबीसी समाजासह दलित, लिंगायत, बंजारा, धनगर हे सर्वजण सोबत आहेत. मात्र भुजबळ यांनी स्वार्थासाठी हे सगळं सुरू केलं आहे. भुजबळ हा प्रचंड विश्वासघाती माणूस आहे," असं जरांगे पाटील म्हणाले.