जालना – सरकारकडून अद्याप कुठलाही निरोप आला नाही. आमची लढाई सुरू आहे. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहे. शांततेत लढाईचे व्यापक स्वरुप होईल. आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. मंत्रालयात जाण्यासाठी पिशव्या भरून ठेवल्यात. परंतु निरोप अजून येत नाही. आम्ही २ पाऊले मागे येतोय. माझ्या शब्दावर मी ठाम आहे. जर सरकारने पुढे काही केले नाही तर पाणी त्याग आणि उपचार बंद होतील असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मराठा समाजातील आंदोलकांना मनोज जरांगे यांनी आवाहन केले आहे की, राज्यातील मराठा बांधवांनी आंदोलनाला ताकदीने पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणाला यश येण्याची शक्यता अधिक आहे. मराठा समाजाने आंदोलन करावे, पाठिंबा वाढवावा परंतु कुठेही आंदोलनाला गालबोट लागणार नाही ही काळजी घ्यावी. मराठा समाजातील तरुणांनी कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये. आत्महत्येसारखा प्रकार करू नये. आम्ही इथं तुम्हाला न्याय देण्याची जीवाची बाजी लावलीय. जर तुम्ही असे काही पाऊल उचलले तर आम्ही हा लढा कुणासाठी उभारतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत आरक्षणाचा फायदा प्रत्येक मराठा समाजातील मुलांना होणार आहे. यापुढील काळात आत्महत्येचे प्रकार करू नये. माझ्यावर विश्वास ठेवा, उग्र आंदोलन करू नये. आत्महत्या करू नये. कुणावरही गुन्हे दाखल होऊ नये. शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करावे ही माझी सर्वांना विनंती आहे. तरीही कुणी तोडफोड करत असेल तर ते आमचे कार्यकर्ते नाहीत, मराठा समाजाचे नाहीत. वाशिमसारख्या ठिकाणी आजही बंद आहेत. बीडमध्ये चक्का जाम झाले आहे. आंदोलन शांततेत व्हायला हवे. कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नका, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहचवतोय. न्याय मिळणार आहे, वाढता पाठिंबा ठेवा, आंदोलन लोकशाही मार्गाने करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले.