मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांजे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा मोर्चा मजल दरमजल करत आता लोणावळ्याला पोहोचला असून, हे मराठा आंदोलक आता उद्या मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र आरक्षण आंदोलन आणि उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडून मुंबईतील आझाद मैदानात तयारी सुरू आहे. मात्र मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मात्र जरांगे पाटील यांनी आपण मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
याबाबत विचारणा केली असता प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही मुंबईतील आझाद मैदानावरच आंदोलन करणार आहोत. त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. तिथे आमचं व्यासपीठ उभं राहिलं आहे. तसेच आम्ही आता आझाद मैदानाच्या मैदानाकडे चाललो आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘’शिष्टमंडळाच्या बैठकीत ५४ लाख नोंदीबाबत चर्चा झाली आहे. सग्या सोयऱ्यांच्याबाबत चर्चा झाली. बैठकीत ते म्हणाले, याबाबत आता अध्यादेश काढण्याचे काम सुरू आहे. मग मी त्यांना म्हणालो, आम्ही मुंबईकडे निघालो आहे. आंदोलन आम्ही थांबवणार नाही, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबतची ही बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे पाटील आंदोनवार ठाम आहेत. आता आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.