नेवासा : ''गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा'', असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना दिले. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने जल्लोष करण्यास तयार राहावे. शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. ख-या अर्थाने वारकरी व शेतक-यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे. मात्र आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे.
(भाजपा सरकारने मराठा आरक्षण दिल्यास उत्सव करू - काँग्रेस)
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांनी अभिषेक करून शनिचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे खासदार दिलीप गांधी, संभाजी दहातोंडे होते.