पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी तसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात झाली आहे.
आंदोलनात सहभागी होणार्यांसाठी खास आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या आचारसंहितेनुसारच आंदोलकांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाप्रसंगी मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनाच्या काळात आत्महत्या करणार्या आंदोलकांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच कुटूंबातील एका तरूणास शासकीय नोकरी द्यावी आदी पंधरा मागण्या ही यावेळी मांडण्यात आल्या.
याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर लोकमतशी बोलताना म्हणाले की, आजपर्यंत संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले आहेत.त्यातील काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून काही विषयांवर जी.आर काढण्यात आले आहेत. त्यामुळे या मागण्यांची पूर्ण अंमलबजावणी न झाल्याने फसवणुकीची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. मधल्या काळात झालेला उद्रेकही त्याचाच भाग असून त्यावेळी बाह्यशक्ती घुसल्याने आंदोलनाला गालबोट लागले. आता मात्र आम्ही लोकशाही मार्गाने सुरु केलेले चक्री उपोषण बेमुदत असणार असून त्यात महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
आंदोलकांसाठी आचारसंहिता
- आंदोलन शांततेने, संयमाने व शिस्तीने करावे, गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये
- प्रक्षोभक व भडकावू घोषणा-भाषणे करू नये,
- आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्या,
- अनुचित प्रकार करणार्यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या, अशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावे,