लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/जालना: मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असतानाच आता रविवापासून गावोगावी आमरण उपोषण करा अशी हाक मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे.
शनिवारी दिवसभरात विविध ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली. गेल्या तीन दिवसात एकूण सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत. गावबंदीचे लोणही वाढल्याने राजकीय नेते मंडळींचे धाबे दणाणले आहेत. काही नेतेमंडळीच्या वाहनांवर दगडफेकही झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडवर आले असून जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवारी मराठा आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या उपसिमितीची तातडीने बैठकही बोलावली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे.
३ दिवसांत ७ आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी मराठवाड्यात तीन दिवसांत सात जणांनी आत्महत्या केल्या. अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी, जि. जालना), आपतगाव (छत्रपती संभाजीनगर), देवजना (ता. कळमनुरी, जि. हिंगोली), डोमगाव (जि. धाराशिव), गिरवली (ता. अंबाजोगाई, जि. बीड), ढाळेगाव (जि. लातूर) व उमरदरा (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) येथील समाजबांधवांनी आत्महत्या केल्या.
साखळी उपोषणाचे २९ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणात रूपांतर होईल. शासनाने आंदोलन सहज घेऊ नये. गावात नेत्यांना येऊ देऊ नका. तुम्हीही नेत्यांच्या दारात जाऊ नका. चर्चा करून कायमचा तोडगा जागेवर काढायचा असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ. मला बोलता येतेय तोवर चर्चेसाठी या. तुमचा रस्ता कोणी अडविला तर मी तिथे येईन. - मनोज जरांगे-पाटील
समंजसपणाची भूमिका घ्यावी
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोमवारच्या बैठकीतही काही निर्णय घेतले जातील. मनोज जरांगे-पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी समंजसपणा घ्यावा.-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
जरांगेंनी सरकारशी चर्चा करावी
आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल आहेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन हमी दिली आहे. शपथ फळाला यावी म्हणून मी प्रयत्न करेन. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा करावी.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यावी.-शरद पवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस