यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा ४ जून रोजी लागणार आहे. तसेच त्या निकालामधून देशात कुणाचं सरकार येणार हेही स्पष्ट होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही कुठल्या पक्षाचं वर्चस्व राहील, याचे संकेतही या निकालांमधून मिळतील. आता त्याच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या पक्षासमोर लगेचच मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मोठं आव्हान उभं राहणार आहे.
याबाबत माहिती देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जून महिन्यामध्ये ४ जून रोजी उपोषण करण्यात येणार आहे. तर सभा ८ जून रोजी होईल. उद्या दुपारी १ वाजता आम्ही पाहणी करण्यासाठी नारायण गडावर जाणार आहोत. तिथल्या तयारीचा उद्या आढावा घेतला जाईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
गतवर्षी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील यांचं नाव राज्यभरात पोहोचलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. तसेच त्यासाठी उपोषण, आंदोलन आणि मोर्चे काढून सरकारला जेरीस आणले होते. अखेरीस मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे जीआर काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र त्याची योग्य पूर्तता सरकारकडून झालेली नाही. त्यामुळेच आता निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारण्याची शक्यता आहे.