मुंबई : राज्यभरात मराठा मोर्चे निघत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका ऐकण्यास नकार दिल्याने आता ही याचिका सुनावणीसाठी वेगळ्या खंडपीठापुढे जाणार आहे.मराठा व मुस्लिम समाजाला अनुक्रमे १६ व पाच टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अनेक जणांनी आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकांवर अंतरिम आदेश देत राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र, १५ महिने उलटूनही या याचिकांवर अंतिम सुनावणी होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या याचिकांवर तीन महिन्यांत निर्णय देण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयाने या याचिकांवर जलदगतीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे पाटील यांनी बुधवारी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे नव्याने याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयाने आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, अन्य खंडपीठापुढे याचिका दाखल करा, असे निर्देश पाटील यांना दिले. सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकार पुढील आठवड्यात मुख्य न्यायाधीश मंजूला चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर स्वत:हून ही याचिका सादर करणार आहे. (प्रतिनिधी)
मराठा आरक्षण; नव्या खंडपीठाकडे
By admin | Published: September 22, 2016 5:10 AM