राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाकडून आक्रमकपणे मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेचे पडसाद या वर्षी कार्तिकी एकादशीला होणाऱ्या शासकीय महापूजेवरही उमटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तसेच यावर्षी शासकीय महापूजेसाठी कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना बोलावू नये, अशी मागणी मराठा समाजाकडून मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर यावर्षी कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, असा निर्णय मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या प्रक्षोभानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून, मंदिर समिती मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारला कळवण्यात येणार आहे. गहिनीनाथ महाराज औसेकरांसह विठ्ठल मंदिरी समितीच्या अध्यक्षांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. आज पंढरपूर येथे सर्व मराठा समाज आज निवेदन देऊन गेला आहे. यावेळेस किंवा मराठा आरक्षणाबाबतचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्याही मंत्र्याला येऊ देणार नाही. ही गोष्ट आम्ही महाराष्ट्र सरकारच्या कानावर आणि विधी आणि न्याय विभागाच्या कानावर घालू, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी सांगितले.
आज पंढरपूर मध्ये भक्तनिवास येथे कार्तिकी एकादशीच्या नियोजनाची बैठक सुरू असताना या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत तिथे प्रवेश केला. तसेच कार्तिकी एकादशीला कोणत्याही उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना महापूजेसाठी येऊ देणार नाही तर मंदिर समितीने देखील कोणत्याही उपमुख्यमंत्री आमदार खासदारांना निमंत्रित करू नये, असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर मंदिर समितीने हा निर्णय़ घेतला आहे.