जालना - Manoj Jarange Patil PC ( Marathi News ) २४ फेब्रुवारीपासून मराठा आंदोलन सलग होणार आहे. ३ मार्चपासून जिल्हाजिल्ह्यात शांततेत रास्ता रोको होणार आहेत. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतील. सकाळी ११-१२ दरम्यान रस्ता रोको होतील. ३ मार्चला लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्न कार्य असणाऱ्यांनी दुपारच्या लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी करावा असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे आवाहन लोकांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संध्याकाळी लग्न ठेवलं तर लग्नाला येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही. लोक रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळे मराठा समाजासह इतर समाजातील बांधवांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मुहूर्त पुढे ढकलावेत. लग्नासाठी प्रत्येक जण एकमेकांच्या कार्यात सहभागी होतात. वधू वरांना आशीर्वाद देतात. ३ तारखेचं आंदोलन ठरलेले आहे. त्यामुळे ३ तारखेचं दुपारचे लग्न पुढे ढकललं तर आंदोलनात सहभागी झालेल्यांनाही लग्नात येता येईल. नवरा-नवरीलाही आंदोलनात सहभागी होता येईल असं त्यांनी म्हटलं.
तसेच ३ मार्चच्या रास्ता रोकोची तयारी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने करावी. ३ तारखेचा रास्ता रोको अशारितीने झाला पाहिजे की भारतात याआधी कधी झाला नसेल. ताकदीने जिल्ह्यातील लोकांनी बाहेर यावे. लाखोंच्या संख्येने शांततेने रास्ता रोको, एकाच वेळी एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको करायचा आहे. सकाळी ११ ते १२ वेळेत हे करायचे आहे. ३ मार्चचे लग्नसोहळे संध्याकाळी ढकलावेत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजय बारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप महिला करतात. हा ट्रॅप आहे. मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा एक नेता यांनी मिळून जरांगेंच्या विरोधात बोल असं त्याला बजावले आहे. बारस्कर कोण आहे हे माहिती नाही. माझ्याविरोधात बोलण्यासाठी ४० लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. एका दिवसांत एवढे चॅनल त्याला उपलब्ध झाले. १९ वर्षात मला चॅनल मिळाले नाही. मी १९ वर्ष संघर्ष करतोय. जो कोणी बडा नेता याच्यामागे आहे तुम्ही बारस्करला साथ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.