मागच्या काही काळापासून राज्यात पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, मनोज जरांजे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सातत्याने सगेसोयरेचा निकष लावण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र सगेसोयरे हा निकष टिकणार नाही, असं महत्त्वपूर्ण मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील आपलं मत मांडताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, सगेसोयरे हा निकष टिकणार नाही. कारण आपल्या देशामध्ये जात ही कुटुंबाकडून येते. आई-वडिलांकडून येते. ती नातेवाईकांकडून येत नाही. म्हणून मी माझ्या वक्त्यव्यांमध्ये म्हणालो आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठ्यांपुरतेच पक्ष होत चालले आहेत. तर उद्धव ठाकरे आणि भाजपा हे कायस्थ, ब्राह्मण असल्याने आम्हाला काय घेणं देणं आहे, असं म्हणत तेही भूमिका घेत नाही आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केवळ बहुजन वंचित आघाडीनेच भूमिका मांडली. या बैठकीला अनेक पक्षांचे नेते अनुपस्थित हाेते. या प्रश्नावरून राज्यातील वातावरण गढूळ आणि विभक्त झाले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे राजकीय पक्ष आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेत नाहीत. या आंदोलनाकडे ते कोंबड्याच्या झुंजी म्हणून पाहात असल्याचाही आरोप आंबेडकर यांनी केला.
''गरीब आणि सामान्य मराठ्यांना या आरक्षणाच्या आंदोलनात फसवले जात आहे, निझामी मराठे हे रयतेच्या मराठ्यांना स्वीकारत नाहीत. आरक्षणाची वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठीच ही आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत’’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.