यवतमाळ: मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक रस्ते आंदोलकांनी अडवले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक रस्ते आणि महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मात्र यवतमाळमधील एका रस्त्यावर थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे.विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता आंदोलकांनी रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागपूर-बोरी-तुळजापूर मार्ग आंदोलकांनी सकाळी सात वाजल्यापासून अडवला आहे. मात्र या रस्त्यावर सकाळपासून एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावर करण्यात आलेल्या ठिय्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना मराठा समाजाकडून जेवण दिलं जातं आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर जेवणाची पंगत पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता अडवण्यात आल्यानं ट्रक, बस, खासगी वाहनांमधील प्रवासी अडकून पडले आहेत. या प्रवाशांना मराठा समाजाकडून जेवण पुरवलं जात आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर सध्या पंगती बसलेल्या दिसत आहेत. ठिय्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असला तरी, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केलेल्या या व्यवस्थेमुळे अनेकांची किमान जेवणाची चिंता दूर झाली आहे.
Maharashtra Bandh: ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला... मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 12:58 PM