पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका हा सध्या कायदेशीर मार्ग आहे, असे मत वंचित विकास बहुजन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल, असेही त्यांनी सांगितले. खा. संभाजीराजे यांनी शनिवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाबरोबरच विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊ शकत नाहीत का? शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, समतेचा हा विचार पुढे नेण्यासाठी काय करता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आंबेडकर यांनी २ ते ३ मार्ग आम्हाला सांगितले. अॅड. आंबेडकर म्हणाले की, आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी राज्यसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावर संसदेत सांगितले की, आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली आहे. शरद पवार यांचे राजकारण ४० वर्षे पाहतोय. मराठा आरक्षणावर ते नजीक काळात स्पष्ट भूमिका घेतील, अशी अपेक्षा करू या.
Maratha Reservation: पुनर्विचार याचिका हाच कायदेशीर मार्ग; संभाजीराजेंनी घेतली आंबेडकरांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 8:13 AM