मुंबई- मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आम्हीच निकाली काढणार आहोत. आयोगाच्या अध्यक्षांनी आपलं काम सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा हा आमच्या सरकारनं केला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते मुंबईतल्या राजाराम महाराजांच्या कार्यक्रमात बोलत होते. काही लोक म्हणतात अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, पण तसं केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण हेच सरकार देणार आहे. ज्या लोकांना हे कळतं ते आज बोलू शकत नाहीत, कारण ते दडपणात आहेत, पण ज्यांना हे कळत नाही त्यांना निश्चित भविष्यात हे कळेल की आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र कोर्टाने त्याला स्थगिती दिली. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र स्वातंत्र्योत्तर काळात ते निघून गेलं, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे. शिवस्मारकाच्या उंचीवरून केलेलं राजकारण दुर्दैवी आहे. शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक हे सर्वात उंच स्मारक असेल, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराजांमुळे कोल्हापूर शेतीत समृद्ध झाली आहे. राजाराम महाराजांनी प्रत्येक गावात शाळा असावी, असा आग्रही विचार केला, शिक्षणासाठी दुपटीने तरतूद केली. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी विमानतळ निर्मितीचा विचार राजाराम महाराजांनी पहिल्यांदा मांडला. सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ, शाश्वत शेतीचा विचार, औद्योगिकीकरणाची सुरुवात राजाराम महाराजांनी विसाव्या शतकात केली, राजाराम महाराजांनीच आधुनिक भारताचा मंत्र दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आवर्जून सांगितलं आहे.
Maratha Reservation: ...तर आरक्षण एक दिवसही टिकणार नाही- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 5:03 PM