ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - भाजपा कार्यकारिणीत मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा ठराव मांडला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हा ठराव मांडणार होता मात्र त्यांनी दांडी मारल्याने चंद्रकांतदादा पाटील यांनी हा ठराव मांडला. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा नेतृत्वाने मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, मराठा नेतृत्वाने स्वत:चे खिसे भरले असा आरोप केला. तसंच ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाला घाबरून जाण्याची गरज नाही. हा मोर्चा आपल्याविरोधातील नाही. या समाजाचा आक्रोश हा ४० वर्षांचा असून तो काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना आपण काय करत आहोत, ते सांगा. अन्यथा असा आक्रोश आपल्याविरोधात पुढे येईल, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकारिणीत बुधवारी घेतला होता.
जनसंघाचे भाजपमध्ये रूपांतर झाल्यानंतर अद्याप पक्षाच्या कार्यकारिणीवर एखाद्या समाजाच्या आरक्षणावर ठराव मांडण्याची वेळ कधी आली नव्हती. पण लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चांची दखल या सरकारला घ्यावी लागली असल्याचे हे प्रतीक असल्याचे बोलले जाते. कार्यकारिणीचा समारोप ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.