- साेमनाथ खताळबीड - मराठवाड्यातील मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत केली जात आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शोध घेतल्यानंतर १९१३ ते १९६७ या कालावधीतील ६३ गावांमध्ये कुणबी असल्याच्या ९१२ नोंदी आढळून आल्या होत्या. आता १९६७ ते २०२३ पर्यंत देण्यात आलेल्या कुणबी नोंदीचा शोध सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर, आष्टी व गेवराई या तालुक्यांत कुणबी प्रमाणापत्रांच्या नोंदी सापडल्या होत्या. बीड तालुक्यातील आठ गावांमध्ये लावणीपत्रक गाव नमुना नं. ६, गेवराई व शिरुर तालुक्यांतील गावांमध्ये जन्म-मृत्यू नोंदवही, पाटोदा तालुक्यात खासरा पत्रक, जन्म-मृत्यू नोंद नमुना नं. १४, क पत्रक, खासरा पत्र, जनगणना रजिस्टर व कुणबी जात नाेंद असलेले शैक्षणिक पुरावे, आष्टी तालुक्यात गावांमध्ये गाव नमुना १४ जन्म-मृत्यू रजिस्टर, माजलगाव व वडवणी तालुक्यातील गावामध्ये क पत्रक व हक्क नोंदवही यावर कुणबीची नोंद आढळून आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समितीला जिल्ह्यातील कुणबी नोंदींची माहिती सादर केली जाणार आहे.