पुणे : मराठा बांधवांकडून आज (गुरुवार) आरक्षणासाठी भव्य मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या बंदच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच एसटी बसेसचे नुकसान होवू नये याकरिता एसटी महामंडळाच्यावतीने सावधानता बाळगण्यात आली आहे. महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख आगारांना विशेष उपाययोजनांच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलनाच्या कालावधीत प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेवून वाहतुकीचे नियोजन सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आंदोलनाच्या काळात एसटी प्रशासनाला बसगाड्यांचे, बसस्थानकाचे, चौकशी कक्ष, आगार व इतर मालमत्तेच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. दरम्यान काळजी घेण्याकरिता महामंडळाने विभागीत पातळीवर नियंत्रण कक्ष, त्याची संपूर्ण माहिती राज्य परिवहनच्या मध्यवर्ती कार्यालयातील नियंत्रण व महाव्यवस्थापक कळविण्यास सांगितले आहे. याबरोबरच बसस्थानक, बसेस, प्रवाशांची सुरक्षा यांच्याकरिता पुरेसा पोलीस बंदोबस्त मागवून घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पोलीसांच्या मदतीने व परवानगीने बस वाहतूक सुरु ठेवावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे. संप,बंद्, व आंदोलनाच्या कालावधीत विभागांमधील उपस्थिती तसेच घडणा-या घटनांची माहिती राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयातील नियंत्रण कक्षास त्वरीत देण्यात यावी.
आंदोलना दरम्यान बसेस अडविण्याचा किंवा त्या बसेसची हानी करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, याबरोबरच चालक, वाहक, यांना प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणेबाबत जागृती करण्याबाबत, आंदोलनामुळे फे-या रद्द झाल्यास आरक्षित केलेल्या तिकीटांचा परतावा देण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना वाहतूक महाव्यवस्थापकांच्यावतीने देण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या कालावधीत महामंडळाच्या बसेसना जाळ्या बसविण्यात येणार आहे. स्थानकावर प्रथमोपचार सुविधा आणि वाहतूक विस्क ळीत झाल्यास पोस्ट व टेलिग्राम विभागाकडून देण्यात येणा-या डाक थैल्यांची वाहतूक वेळेत व सुरक्षित पोहोचविण्याची हमी देता येणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.