Ajit Pawar ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'जरांगे फॅक्टर'चा फटका बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही याप्रकरणी लक्ष घालून मार्ग काढू, असं काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारकडून सगेसोयरे अधिसूचनेबाबत निर्णय घेण्यावर कोणी आणि काय बोलायचं, हे आमचं ठरलं आहे. आगामी काळात आम्ही यात लक्ष घालून मार्ग काढू," अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
जरांगे यांनी समाजाला काय आवाहन केलं?
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. सरकारकडून कुणीही भेटायला आलेले नाही. निवडणूक निकालानंतर कुणाचेही आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले.
मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका
मागील लोकसभा निवडणुकीत मतविभागणीला कारणीभूत ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीला बाजूला सारत बहुसंख्य दलित-मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा, शेतकरी-बेरोजगारांमध्ये असलेला असंतोष, फोडाफोडीच्या राजकारणामुळे सरकारविरोधात तयार झालेले जनमत आणि मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन अशा अनेक घटकांचा जबर फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला. परिणामी, मराठवाड्यात महायुतीची सात जागांवरून एका जागेवर घसरण झाली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता उर्वरित सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यात भाजपला चार जागांचा फटका बसला तर काँग़्रेसला तीन जागांचा फायदा झाला. एमआयएमची एक जागाही गेली. शिवसेनेची फाटाफूट आणि धनुष्यबाण नसल्याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो, असे अनुमान निवडणूकपूर्व काढण्यात येत होते. मात्र मतदारांनी या शक्यतेला छेद दिला. छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली अशा चार जागा उद्धवसेनेने लढविल्या. पैकी संभाजीनगर वगळता इतर तिन्ही जागा ठाकरे यांना मिळाल्या आहेत.
नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेतल्याचा फायदा भाजपला झाला नाही. उलट या फोडाफोडीचा फटकाच बसला. लातूरमध्ये डॉ. शिवाजीराव काळगे यांचा विजय काँग्रेसचे मनोबल उंचावणारा आहे. मराठा, लिंगायत, ओबीसी, मुस्लिम आणि काही प्रमाणात दलित मतांमुळे डॉ. काळगे विजयी झाले. जालन्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी पराभव केल्याने दानवे यांचा षटकार हुकला. दानवेंना जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला. मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी सुमारे सव्वा लाख मते घेऊनदेखील दानवेंना फायदा झाला नाही.
बीडमध्येदेखील भाजपच्या पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलनाचा फटका बसला. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादात राष्ट्रवादीचे (शरद पवार) बजरंग सोनवणे यांचे पारडे जड राहिले! अगदी शेवटच्या ३२ व्या फेरीपर्यंत निकालात उलटफेर होत होता. शेवटच्या फेरीत सोनवणे विजयी झाले. परभणीतही मराठा-ओबीसी असा वाद झाला. मात्र तिथे मराठा मतांशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची साथ मिळाल्याने उद्धव सेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांची हॅटट्रिक झाली.
मराठवाडा : २०२४ भाजप : ० उध्दवसेना : ३ काँग्रेस : ३ शिंदेसेना : १राष्ट्रवादी शरद पवार गट : १२०१९ :भाजप : ४ शिवसेना : ३एमआयएम : १