मुंबई/बीड - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिल्यापासून मराठा समाजाकडन त्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, बीडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून आत्महत्या केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या आत्महत्येबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर तरुणाच्या मृत्यूचा गैरफायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाइड नोट लिहून ती व्हायरल करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार बीडमधील विवेक रहाडे नावाच्या १८ वर्षीय तरुणाने आथ्महत्या केली होती. त्यानंतर या तरुण्याच्या नावाने एक सुसाइड नोट लिहून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. महाठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्द्याशी संबंध जोडण्यात आल्याने या आत्महत्येवरून खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या सुसाइड नोटचा अभ्यास केला असता ती खोटी असल्याचे समोर आले. तीन नमुन्यांमधून या सुसाइड नोटमधील हस्ताक्षर तपासले असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे आले होते वृत्तमी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याचे वृत्त आले होते. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगण्यात येत होते.संभाजीराजे छत्रपतींनीही केले होते आवाहनकोल्हापूर: मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन केले होते.'विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!' अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी श्रद्धांजली वाहिली होती.
Maratha Reservation : बीडमधील त्या तरुणाची सुसाईड नोट बनावट, लिहिणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 6:34 PM