पुणे - राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आढावा घेणार आहेत. दोन दिवसांत आढावा घेऊन सर्वेक्षणाची वस्तुस्थिती मांडणार आहे. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशीच सॉफ्टवेअरमधील त्रुटी समोर आल्या. अनेक जिल्ह्यातील गावे, नगरपालिकांचा समावेश नसल्याचे आढळले. तसेच अनेक ठिकाणी सर्व्हर स्लो असल्याचे आढळल्याने मागासवर्ग आयोगाने त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते.
दुसरीकडे, ॲपमध्ये अनेक अडचणी आल्याने सर्वेक्षणात अडथळे आले. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने सदस्यांना जिल्ह्यांमध्ये जाऊन तेथील सर्वेक्षणाचा आढावा घेण्याची सूचना केली आहे. या सदस्यांना काही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार, सदस्य त्या त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सर्वेक्षणातील अडचणी समजून घेत आहेत. तेथील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या दौऱ्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे.