मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा तर ८ जून रोजी सभेचं आयोजन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र आता ८ जून रोजी बीड येथे होणारी मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने जरांगे पाटील यांची ही सभा रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांची सभा ८ जून रोजी बीडमधील नारायणगड येथे होणार होती. या सभेसाठी मराठा आंदोलकांकडून जोरदार तयारीही सुरू होती. मात्र जरांगे पाटील यांच्या या सभेवर दुष्काळाचं सावट पडलं आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांची ही सभा ऐतिहासिक होईल असा दावा करण्यात येत होता. या सभेसाठी ९०० एकरवर तयारी सुरू होती. दरम्यान, सध्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई असून, उन्हाची तीव्रताही अधिक आहे. ही बाब लक्षात घेत ८ जून रोजी होणारी सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आठ जून रोजी बीडमधील नारायण गड येथे होणाऱ्या सभेस सुमारे सहा कोटी मराठे जमतील, असा दावा करण्यात येत होता. तसेच त्यादृष्टीने नियोजनही सुरू होते. मात्र येथे येणाऱ्या मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी ही सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही सभा जून महिन्यानंतर होईल, असं सांगण्यात येत आहे. तसेच याबाबत एक बैठक होणार असून, त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे सभेच्या पुढच्या तारखेबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.