Maratha Reservation : (Marathi News) राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होवू, यासाठी अनेक ट्रॅप लावले गेले, पण आम्ही ते उधळून लावले आहेत. आता पुन्हा एकदा ट्रॅप लावून आंदोलनातून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरु असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सतत बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं, असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाही आहे. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलत आहेत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत, तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारणमध्ये घुसायला लागले आहेत. ७० ते ७५ वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. हे ठरलेले १५-२० जण आहेत. मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत ते. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय, ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सरकारच्या निर्णयाचा ६० लाख मराठा बांधवांना फायदा होणार आहे. काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर श्रेय घेत आहेत. त्यांना आवाहन आहे की श्रेय घेऊ नका, हे सर्व मराठ्यांचं श्रेय आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे. सगेसोयरेबाबत सरकार अध्यादेश काढत नव्हतं. मात्र मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. कायद्यात बदल करताना अधिसूचना काढव्या लागतात आणि सरकारने काढल्या. येत्या १५ फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करायचा आहे. त्यामुळे मुंबईत मराठे गेले आणि आरक्षण घेऊन आले, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या १० तारखेला बेमुदत उपोषण करणार आहे, जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.