अंतरवाली सराटी – मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय, कुणीही आत्महत्या करू नये. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्या, लोकांची लेकरं मरत असताना मज्जा घेऊ नका. मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. उग्र आंदोलन करू नका, शांततेत आंदोलन करू. उद्या २९ तारखेपासून आमरण उपोषण सुरू करा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील लोकांना केले आहे.
जालना इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वयाचा अंदाज घेऊन उद्यापासून आमरण उपोषण सुरू करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करा. एकदिलाने एकत्र बसा. सरकारवर दबाव निर्माण करू. प्रत्येक गावात आमरण उपोषण सुरू करा. आपल्या गावात, आपल्या दारात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचे नाही आणि मराठा समाजानेही राजकीय पक्षांच्या दारात जायचे नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
तसेच आज संध्याकाळपर्यंत सरकारकडून काही उत्तर येतंय ते पाहू. उद्यापासून गावागावत आमरण उपोषण सुरू करा. कुणाच्याही जीवितास धोका झाल्यास त्याची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची असेल. आता दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात झाली आहे. मराठा समाज एकत्र आल्याने समाजाची ताकद मोठी वाढणार आहे. मराठ्यांना बळ द्यायचे असेल आमदार, खासदारांनी मुंबईत जा, आपापल्या परीने संघर्ष करा. राज्यातले कोणकोण आमदार, खासदार, मंत्री एकत्र येतायेत हे पाहू असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा-धनगर बांधवांचे एकच दुखणे आहे. मुस्लीम समाजाचेही दुखणे आहे. त्यांना सुद्धा आरक्षण देऊ देऊ म्हणून गोड बोलून त्यांना आरक्षणापासून लांब ठेवलंय. आमच्यामुळे धनगर समाजही सावध झाला आहे. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर मोठी शक्ती उभी राहील. दोघांनाही आरक्षण मिळेल. मराठा आंदोलन सुरू आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्हाला खरेच मराठ्यांची माया असेल आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.