मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत राणेंनी याचा खुलासा केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, त्यानंतर त्यावर राजकारण झालं आणि काही लोक या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले. न्यायालयात जाणाऱ्या त्या लोकांची चौकशी करायला पाहिजे. योग्य वेळी त्या लोकांची नावे सांगेन.मी भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. फक्त भाजपाच्या समर्थनानं राज्यसभेवर गेलो आहे. सत्ताधाऱ्यांनी पेच निर्माण केल्यानंच आरक्षण रखडल्याचा पुनरुच्चारही नारायण राणेंनी केला आहे. कायद्यात बसेल असं आरक्षण दिलं होतं आणि ते सुरूही झालेलं होतं. आमच्या अहवालात फक्त मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. राणे म्हणाले, राज्य सरकारनं आरक्षण द्यावं, अशी मागणी आम्ही केली होती. सगळे घटनात्मक पेच सोडवता येतात, राणे समितीनं यावर अभ्यास केला आहे. मराठ्यांचा सामाजिक, आर्थिक सर्व्हे केल्यानंतर राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार मिळतो. त्याप्रमाणे अधिकारांचा वापर करून ते आरक्षण देऊ शकतात. अहवाल येण्याआधी वाद निर्माण करणं योग्य नाही, अहवालातील शिफारशीनंतर मी बोलेन, तांत्रिकदृष्ट्या अहवालात मराठा आणि कुणबी दोघांना बसवलं आहे का हे पाहावे लागेल. त्यानंतर अहवालावर बोलेन, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.अहवालातून आरक्षणाला पोषक शिफारशी येतील, अशी आशा आहे. कलम 16, 17 मध्ये बसणारं आणि कायद्यात टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं, असंही राणे म्हणाले आहेत. आम्ही 18 लाख कुटुंबाचा, तर यांनी 45 लाख कुटुंबाचा सर्व्हे केला होता. राज्य मागासवर्ग आयोगाकडे आम्ही अहवाल पाठवला. परंतु मागासवर्ग आयोगाकडून कोणताही अभिप्राय न आल्यानं आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. काँग्रेसला मराठ्यांना तीन टर्मममध्ये आरक्षण देणं का जमलं नाही हे मी सांगू शकत नाही. पण मला जेव्हा मराठा आरक्षणाची जबाबदारी दिली, ती मी चोख पार पाडली. मागासवर्ग आयोगाला राणे समितीनं डावललं नाही, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.
Maratha Reservation: आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 3:49 PM
मराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत.
ठळक मुद्देमराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे.आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत. कलम 16, 17 मध्ये बसणारं आणि कायद्यात टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं