सातारा - गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आरक्षणाच्या मुद्द्याला बळ मिळालं. त्यानंतर आता जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. जिल्ह्याजिल्ह्यात सभा आयोजित केल्या जातात. त्यात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात. जरांगे पाटलांच्या या दौऱ्याचं नियोजन आणि सभा कोण आयोजित करते याबाबत खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी खुलासा केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही राज्याच्या दौऱ्याच्या तारखा नियोजित करतो. त्यानंतर सगळ्यांना सांगितले जाते. तारीख दिली की समाज तयारी करतो. यात विशेष समिती अथवा टीम नाही. खूप जणांचे मत होते समिती, टीम बनवली पाहिजे. परंतु आम्ही मागचा आढावा घेतला तेव्हा समिती, टीम बनवली त्यानंतर अनेकदा फूट पडली, समितीमुळे एक माणूस बाजूला गेला तर फूट पडल्याचे दिसते. त्यामुळे आमचा समाजच आमची टीम आहे. समाजावर सोपवल्यामुळे आरक्षणाचा विषय मार्गी लागतोय, ७० टक्के लढाई यशस्वी झालीय, ३० टक्के बाकी आहे. समाजावर जबाबदारी सोपवली आहे. समाजच मालक असल्याने प्रत्येकजण स्वत:हून पुढे यायला लागले. कुठलेही राजकारण येत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठा समाजाच्या लेकरांनी आत्महत्या केली, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर असताना दिवाळी साजरी करायची नाही असं ठरवलं. आमच्यात टीम असती तर संवादात दुरावा आला असता. सामाजिक काम करताना मालकत्व स्वीकारून चालणार नाही. प्रत्येकाला हे आंदोलन यशस्वी व्हावं असं वाटतंय. मी समोरच्या माणसाच्या जीवनातील दैनंदिन अडचणी वाचतो. मी आंदोलनात दगाफटका कसा झाला, कोणत्या कारणाने झालो, यशस्वी होणारे आंदोलन अचानक मागे कसे पडले, समज-गैरसमज कसे पसरवले जातात यावर मी जास्त अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हे आंदोलन सुरू आहे. सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रसिद्धीमुळे आता प्रोटोकॉलनुसार वागलं पाहिजे असं काहीजण सांगतात, पण मी ऐकत नाही. माझ्या गाडीला कोणी हात दाखवला तरी मी थांबतो, प्रसिद्धीमुळे डोक्यात हवा जाऊ देत नाही. आपण जमिनीवर आहोत, जमिनीवरच राहिले पाहिजे. हवेत जायचं नाही. पहिल्यापासून मी जसा आहे तसाच राहतोय. डोक्यात मस्ती जाऊ देत नाही. मी आहे त्या लोकांमुळे आहे. त्यामुळे लोकांमध्येच राहणार. माझ्या भेटण्यामुळे एका व्यक्तीलाही आनंद होत असेल तर तो आनंद हिरावून घेतला नाही पाहिजे. आपल्यामुळे जर त्याला आनंद मिळत असेल तर का भेटायचे नाही. आपल्याला गर्व चढू द्यायचा नाही. ज्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांना भेटलो नाही तर आपल्या जगण्याला शून्य किंमत आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.