मुंबई - जालन्यात अंतरवाली सराटी इथं पोलीस लाठीचार्जमध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले त्यानंतर राज्यात आगडोंब उसळला. या घटनेला कोण जबाबदार होते ते चित्र आता समोर यायला लागले आहे. यातील एक आरोपी ज्याच्याकडे पिस्तुल सापडले. काही दिवसांपूर्वी राज्यात जातीय दंगली घडणार असं विधान केलेले संजय राऊत यांच्यामुळे या घटनेला पुष्टी मिळाली आहे.जेव्हा मराठा आरक्षणाचे आंदोलन शांततेत पार पडत असताना जालन्यात काही नेते तिथे दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते. त्यात राष्ट्रवादीचे काही नेते, संजय राऊत यांनी आखलेला प्लॅन तिथे अंमलात आणला गेला असा धक्कादायक दावा शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, जालन्यात जो लाठीचार्ज झाला, त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर हा ठरलेला कार्यक्रम होता. या घटनेनंतर लगेच बडे नेते अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. हे पोलीस तपासात निष्पन्न होते. ७-८ मिनिटांचा व्हिडिओ त्यात सगळे चित्र स्पष्ट आले आहे. शांततेत चालणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा जे प्रयत्न करत होते त्यांच्यावर हे शासन कारवाई करणार आहे.एकीकडे राज्यात शांतता नांदू द्या म्हणायचे तर दुसरीकडे जातीजातीत दंगली भडकवण्याचे काम जाणुनबुजून करायचे हे यांनी केले. महाराष्ट्रात दंगली कशा घडतील आणि सरकार बदनाम कसे होईल यासाठी हे लोक प्रयत्न करत होते असा आरोप त्यांनी केला.
तसेच आज परिस्थिती पाहिली तर यांच्या या कारवायांमुळे २ समाजात तेढ निर्माण झाल्याचे दिसून येते. म्हणून सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मी विनंती करतो या लोकांना तातडीने जे मुख्य सूत्रधार आहेत. पिस्तुल मिळाला तो मोहरा आहे. फोटो कुणासोबतही असले तरी दंगल करायला लावणारे हे लोक आहेत. स्वत:च्या न्याय हक्कासाठी मागणी करताना इतरांनी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय अशावेळी जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे अनेक वर्ष ज्यांनी राजकारण केले त्यांनीच हे घडवलं. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.
दरम्यान, काही युवा नेते, जे जालन्याच्या गेस्टहाऊसमध्ये बसले होते. त्याच पक्षाचे माजी मंत्री तिथे होते. या सर्वांनी केलेला तो डाव होता.ते समोर आले आहे. पोलीस तपासात पुढे येतंय. अंतरवालीत घडलेली घटना गुंडाकरवी केलेली दंगल याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी बेछुट आरोप करत नाही तर ही वस्तूस्थिती आहे.पोलीस तपास सुरू असल्याने मी नाव घेत नाही. परंतु त्या २ गटाने घडवलेली ही दंगल आहे. संजय राऊतांनी विधानच केले होते. राज्यात जातीय दंगली भडकवल्या जाणार आहेत कारण त्यांना ही प्लॅनिंग माहिती होती असा थेट आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.