जालना – गेल्या अनेक दिवसांपासून अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून उपोषण सोडले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन केले होते. जालना इथं पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर या घटनेमुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा पेटला. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल राज्यासह देशातील मीडियानेही घेतली होती.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घडलेला एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्री म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल कोर्टानेही घेतली. तुमचे आंदोलन सर्वांपर्यंत पोहचले. मी दिल्लीत गेलो होते तेव्हा मला ये मनोज जरांगे पाटील कौन है असा प्रश्न विचारण्यात आला होता. मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता आहे, तर त्यावर उसने तो सबको हिला के रखा है असं समोरच्यांनी सांगितले हा संवाद शिंदेंनी ऐकवला. तेव्हा उपस्थित गावकऱ्यांमध्ये हशा पिकला.
तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या परंतु त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यावेळी त्यांना नोकरी देण्याचे धाडस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कुणी करत नव्हते. परंतु मी सांगितले जे काही होईल त्याला तोंड देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. आपण ३७०० जणांना नोकऱ्या देऊन टाकू आणि त्या दिल्या. ते आज नोकरीवर आहेत. मराठा समाजाची जी मागणी आहे ते ते आपण पूर्ण करतोय. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठा समाजाला सरकार देतंय. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका समाजासह सरकारचीही आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. एकनाथ शिंदेदेखील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि आपलाच आहे. मराठा समाजाच्या भावनेची मला जाणीव आहे. साताऱ्यात आपले आंदोलन होते तेव्हा माझे बाबा तयारी करत होते. मी विचारले कुठे चाललाय, तर बोलले आंदोलनाला, मी विचारले कोणत्या तर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आहे तिथे चाललोय. समाजाबद्दल ही आपुलकी आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.