कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांत चौघांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यात चौघांनी मृत्यूला कवटाळले तर कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलनातील कार्यकर्ता असलेल्या तरुणाने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. कणेरीवाडी (करवीर, कोल्हापूर) येथील तरुण विनायक परशराम गुदगी (२६) याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची होती.तो नोकरी शोधत होता. त्याने मित्रांजवळ आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते; पण त्याची फारशी गांभीर्याने कोणी दखल घेतली नाही. विनायकच्या आत्महत्येनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी दसरा चौकात ‘रास्ता रोको’ करून राज्य सरकारचा निषेध केला. राज्य सरकारच्या संवेदनाहीन धोरणामुळे विनायकचा बळी गेल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याच्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.पोलिसांनी परशराम गुदगी व त्यांचा मुलगा प्रमोद यांच्यावर दबाव आणून त्यांना हवा तसा जबाब लिहून घेतल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. विनायकचे वडील व भाऊ यांनी नोकरी नसल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. दोघांचेही लेखी जबाब साक्षीदार सचिन तोडकर यांच्यासमोर पोलिसांनी घेतले.
Maratha Reservation: कोल्हापुरातील तरुणाने मित्रांना सांगून संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 4:47 AM