ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - विविध मागण्यासांठी राज्यभर लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. नागपुरातही सकल मराठा समाजातर्फे २५ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जाणार आहे, अशी घोषणा सकल मराठा सामाजातर्फे राजे मुधोजी भोसले व महिला प्रतिनिधींनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
ममता भोसले, यशोधरा राजे भोसले यांनी सांगितले की, कोपर्डीच्या शिवारात चिमुरडीवर झालेला सामूहिक अत्याचार व हत्येमुळे समाजमन पेटून उठले आहे. त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे. मराठा समाजात मोठमोठे मंत्री झाले, अशी उदाहरणे दिली जात आहेत. मात्र, समाजात अजूनही बरेच लोक रिक्षा चालविणारे, गोंधळ करून उपजीविका भागविणारे आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हाला कुणाचे पोट कापून काही मिळवाये नाही. पण आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रेशीमबाग मैदान येथून मोर्चा निघेल. महाल, कॉटनमार्केट, टेकडी रोड, संविधान चौकमार्गे कस्तूरचंद पार्कवर मोर्चा पोहचेल. जिल्हाधिकाºयांना देण्यात येणाºया निवेदनाचे येथे एक मुलगी वाचन करेल. यानंतर पाच मुली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देतील. मुलींचे शिष्टमंडळ निवेदन देऊन कस्तूरचंद पार्कवर परत आल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप होईल. नागपूरचा मोर्चा कुणाच्याही नेतृत्वात निघणार नाही. येथे कुणीही नेता नाही. राजकीय हस्तक्षेप नाही. मोर्चात येणारे समाजबांधव स्वयंस्फूर्तीने येणार आहेत. नागपूर जिल्ह्यात अडीच लाख मराठा समाज असून फक्त नागपूर जिल्ह्यातील लोकच या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चाच्या नियोजनासाठी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता तेजसिंगराव भोसले सभागृह, तुळशीबाग रोड, महाल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रशांत मोहिते यांनी सांगितले की, १४ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर निघणारा मोर्चा वेगळा आहे. याच मागण्यांसाठी मराठा प्रसारक समाज मंडळ अधिवेशनावर मोर्चा काढत असेल तर त्यांचे स्वागतच आहे