हितेन नाईक / आरिफ पटेल, पालघर कोपर्डी अत्याचारातील आरोपींना तत्पर सजा द्या, मराठ्यांना आरक्षण द्या आदी मागण्यांसाठी रविवारी येथे काढण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चात महिलांचा विक्रमी सहभाग होता.शहरवासीयांच्या सोयीसाठी मोर्चा रस्त्याच्या एका बाजूने काढल्याने जनजीवन व वाहतूक सुरळीत सुरू होती, हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. दुपारी १ वा. सुरू झालेल्या मोर्चाची दुपारी ४ वाजता सांगता झाली. स. तु. कदम विद्यालयाच्या पटांगणातील रंगमंचावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. सकाळी ८ वाजेपासून मोर्चेकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी १०० स्वयंसेवकांमागे काळ्या रंगाची ओपन जीप, त्यात मोर्चाचे टी-शर्ट घातलेल्या भगवा फेटा बांधलेल्या युवती होत्या. त्यातच, बाल शिवाजीदेखील होता. त्या पाठोपाठ जीपमध्ये महिला, त्याच वेषभूषेत होत्या. त्यामागे तीन-तीनच्या रांगेने निघालेल्या मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या. बाळांना कडेवर घेऊन मोर्चात आलेल्या स्त्रियांची संख्या मोठी होती. प्रत्येकाने भगवी टोपी, हातात फलक घेतले होते. सुन्नी मुस्लीम बांधवांकडून पिण्याचे पाणी, बिस्किटे, नाश्ता यांचे वाटप होत होते.त्या पाठोपाठ मुले, युवक व नंतर पुरुष मोर्चेकरी अशी रचना होती. पालघर जिल्हा मुस्लीम समाजाने मोर्चाचे स्वागत करून, त्यांना नाश्ता दिला आणि पाठिंब्याचे पत्रकही दिले. दुपारी ३च्या सुमारास मोर्चा आर्यन हायस्कूलच्या पटांगणात आला. तिथे त्याचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर, आठ युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर, मराठेशाहीचा गौरव करणारी भाषणे युवती व स्त्रियांनी केली. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. अशा प्रकारे अत्यंत शांततेने व स्वच्छता राखून शिस्तबद्ध पद्धतीने या मोर्चाची सांगता झाली. पालघर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा मोर्चा काढण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचे विसर्जन झाल्याने, कोठेही गैरसोय आणि वाहतूककोंडी झाली नाही.
पालघरच्या मराठा मूक मोर्चात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व सहभाग
By admin | Published: October 24, 2016 4:48 AM