कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र व इतर राज्यांत लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मूक मोर्चे काढले; पण शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात बुधवारी (दि. १९) महागोलमेज परिषदेचे आयोजन केल्याची माहिती क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोलमेज परिषद येथील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी १०.३० वाजता सुरु होईल व दिवसभर चालेल. त्यासाठी राज्यभरातून ५०० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. सकल मराठा समाजातर्फे राज्यभरात निघालेल्या मोर्चाला नेतृत्व नव्हते. ती समाजाने व्यक्त केलेली उस्फूर्त प्रतिक्रिया होती. परंतु असा नेतृत्वहीन समाज पुढे नेणे शक्य नाही. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या नेतृत्वाखाली आकार घेईल, याचा महत्वाचा निर्णय या परिषदेत घेतला जाणार आहे. त्यासाठी एक राज्यव्यापी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. महागोलमेज परिषदेसाठी मराठा आरक्षण अभ्यास समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोणत्याही राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुंबई होणाऱ्या मोर्चासाठी जोरदार आखणी सुरू आहे़ (प्रतिनिधी)
कोल्हापुरात मराठा समाजाची बुधवारी परिषद
By admin | Published: April 16, 2017 2:54 AM